मुंबई : सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (६५) यांचे आज मुंबईत निधन झाले. आपल्या भारदस्त आवाजाने त्यांनी टिव्हीवर एक काळ गाजवला होता. दूरदर्शनपासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती.
प्रदीप भिडे यांच्या आवाजाने वृत्तनिवेदन क्षेत्रात २५ वर्षे सातत्याने अधिराज्य गाजवले. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात २ ऑक्टोबर १९७२ रोजी झाली. प्रदीप भिडे एप्रिल १९७४ पासून दूरदर्शनमध्ये दाखल झाले होते, त्यावेळी भक्ती बर्वे-इनामदार, ज्योत्स्ना किरपेकर, स्मिता पाटील-बब्बर हे सारे प्रदीप भिडे यांचे समकालीन तसेच समव्यावसायिक सहकारी होते.
वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरवात केली होती. दूरदर्शनच्या वृत्तविभागात अनुवादक म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्:मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांत त्यांना विशेष रूची होती. प्रसार माध्यमात करिअर सुरू करावे, असा पहिल्यापासूनच त्यांचा मानस होता. दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाल्याची माहिती सह्याद्री वाहिनीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून अधिकृतरित्या दिली.