अहमदनगर : पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनात अखेर आज चौथ्या दिवशी सकारात्मक तोडगा निघाला आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी पुणतांब्यात येऊन शेतक-यांशी चर्चा केली. शेतक-यांनी केलेल्या मागण्या विविध विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळे या सर्व विभागांशी संबंधित मंत्री आणि अधिका-यांची मंगळवारी (७ जून) मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे, असे आश्वासान भुसे यांनी दिले.
या बैठकीचे निमंत्रण स्वीकारून शेतक-यांनी सध्या सुरू असलेले आंदोलन तूर्त स्थगित केले असून मंगळवारच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले आहे.
पुणतांब्यातील शेतक-यांनी १ जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. ५ जूनपर्यंत दररोज धरणे धरण्यात येणार होते. आज चौथ्या दिवशी कृषिमंत्री भुसे यांनी पुणतांब्यात येऊन शेतक-यांशी चर्चा केली. प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चेत प्रत्येक मागणीवर विचार करण्यात आला.
या मागण्या सरकारमधील विविध विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळे या विषयावर मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचे ठरवण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिका-यांसोबत मंगळवारी, ७ जूनला ही बैठक होणार आहे.
यासाठी पुणतांब्यातील शेतक-यांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. हा तोडगा आंदोलक शेतक-यांनीही मान्य केला. मंगळवारची बैठक होईपर्यंत सध्या सुरू असलेले आंदोलनही तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मंगळवारी होणा-या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.