मुंबई : एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे सरकार स्थापन होऊन १५ दिवस झाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. यामुळे अनेक कामे रखडली आहेत आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक जनावरे, शेती पुरामुळे वाहून गेली आहे मात्र, असंवेदनशील शिंदे सरकार गेली १५ दिवस जेवणावळीतच व्यस्त असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
औरंगाबाद, उस्मानाबाद नामकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केले होते. मात्र, शिंदे सरकार औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करून स्वत: क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. १५ दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या भरवशावरच राज्य सुरू आहे आणि जनता वा-यावर असल्याची टीका खडसेंनी केली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील जनतेशी काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे जनतेला दिलासा कोण देणार? असा प्रश्नही एकनाथ खडसेंनी राज्य सरकारला विचारला आहे.