24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत फूट?

महाविकास आघाडीत फूट?

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी मतदान होत असून दहावी जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपाने महाविकास आघाडीसोबत असलेल्या अपक्ष व छोट्या पक्षाच्या आमदारांना गळाला लावल्याची चर्चा असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाचेच काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. यामुळे कोणाची बेरीज होणार व कोणाची वजाबाकी याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी आपली अतिरिक्त मते कॉंग्रेस, राष्ट्रवादीला देण्यास विरोध केल्याचे समजते. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेकडे सहा-सात अतिरिक्त मते आहेत, असे पक्षाच्या एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

विधानसभा सदस्यांद्वारे विधानपरिषदेवर पाठवण्यात येणा-या १० जागांसाठी आज मतदान होणार असून, ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेच्या २८८ पैकी एक जागा शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त आहे, तर सध्या तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख व नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली आहे. यामुळे २८५ सदस्य मतदान करणार असून निवडून येण्यासाठी २६ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार उभे आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीकडे दोन आमदार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ असले तरी काँग्रेसला ८ मतांची गरज आहे.

महाविकास आघाडीला पाठिंबा असलेल्या अपक्ष व छोट्या पक्षाच्या आमदारांची किती मते कोणत्या उमेदवारांच्या कोट्यात टाकायची याचे नियोजन करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज झाली. मुख्यमंत्री उद्या सकाळी मतदानापूर्वी याबाबत या आमदारांना सूचना देणार आहेत. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आघाडीच्या नेत्यांनी आमचे सर्व सहा उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील असा दावा केला.

दरम्यान विधान परिषदेच्या निवडणूकीत गुप्त मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असल्याने ही निवडणुका अधिक रंजक ठरण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीत सदस्यांना त्यांची मतपत्रिका आपापल्या पक्षाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागते, मात्र विधान परिषद निवडणुकीत मतपत्रिका गुप्त ठेवण्यात येणार असल्याने क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता बळावली आहे. त्याचबरोबर अपक्ष आमदार कोणाला मतदान करतील, याबाबतही साशंकता वाढली आहे.

भाजपचे आमदार आघाडीच्या संपर्कात – नाना पटोले यांचा दावा
आघाडीचे एकही मत फुटणार नाही, उलट भाजपलाच विधानपरिषद निवडणुकीत अंतर्गत कलहाचा फटका बसेल. भाजपचे काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.

एमआयएम आमदाराचे खडसेंना मतदान?
एमआयएमचे उत्तर महाराष्ट्रातील आमदार फारुख शहा यांनी आपण खानदेशातील नेते एकनाथ खडसे यांना मतदान करणार असल्याचे उघडपणे सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतल्याचे समजते. त्यामुळे एमआयएमचा राष्ट्रवादीला फायदा होणार असल्याचे गणित घातले जात आहे.

असे आहे मतांचे गणित!
या निवडणुकीत विजयासाठी मतांचा कोटा आहे २६.२०. त्यामुळे पहिल्या फेरीत विजयासाठी २७ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. विधानसभेत शिवसेनेचे ५५ आमदार असून सचिन अहिर व अमशा पडवी यांंच्या विजयासाठी ५४ मतांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. त्यात नवाब मलिक व अनिल देशमुख यांनी मतदानाची परवानगी नाही. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर व एकनाथ खडसे यांच्या विजयासाठी त्यांना बाहेरच्या तीन मतांची गरज आहे. काँग्रेसचे ४४ आमदार असून त्यांचेही चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप मैदानात आहेत. त्यांना तब्बल १० मते बाहेरून मिळवावी लागणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या