20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार!

खतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार!

एकमत ऑनलाईन

मुंबई/औरंगाबाद : देशात पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, गॅस सिलिंडर यासह इतर वस्तूंचे दर वाढल्याने अगोदरच सामान्य माणूस महागाईच्या खाईत होरपळत असतानाच केंद्राने रासायनिक खताच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून शेतक-यांनाही या खाईत लोटले आहे. अगोदरच डिझेल महागल्याने नांगरणी, पेरणीसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्यातच बियाणे, किटकनाशकासह विविध औषधांना ज्यादा पैसे मोजावे लागत असतानाच आता खतांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. कारण केंद्र सरकारने यंदा तब्बल ४५ ते ६० टक्क्यांनी किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे १२०० रुपयांना मिळणा-या डीएपी पोत्यासाठी आता तब्बल २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

खरे तर यंदा मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरी सुखावला होता आणि जोमाने खरिपाच्या पूर्वतयारीला लागला होता. मात्र, ऐन पावसाळ््याच्या तोंडावर रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढविल्याने आता शेतक-यांचे कंबरडे मोडणार आहे. मान्सूनचे आगमन होण्यास पंधरवडा उरला आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन शेतक-यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत. या कामाला हात घालत असतानाच रासायनिक खतांच्या दरात केंद्र शासनाने मोठी वाढ केली आहे. ही दरवाढ ४५ ते ६० टक्के इतकी असल्याने आता शेतक-यांचे आर्थिक गणित पूर्णता बिघडणार आहे.

एकीकडे एक तर शेतमालाला उत्पन्न खर्चापेक्षा अपेक्षित दर मिळत नाही. ज्या दरात खरेदी करेल, त्याच दरात माल विकावा लागतो. मात्र, दुसरीकडे शेतीला लागणारी सर्व साधने अव्वाच्या सव्वा किमतीत खरेदी करावी लागतात. अगोदरच पेट्रोलचा दर १०० रुपयांवर, तर डिझेल ९० रुपयांवर गेले आहे. शेतीकामासाठी डिझेल मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे यंदा शेतीची नांगरणी, मोगडणी, पंजी, पेरणीचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे शेतक-यांना यासाठी अतिरिक्त किंमत मोजावी लागणार आहे. तसेच खाद्यतेल, गॅस सिलेंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. याशिवाय बियाणे, शेतीशी संबंधित साधनांचे दरही वाढलेले असताना त्यात केंद्र सरकारने अधिक भर टाकत रासायनिक खताच्या दरात उच्चांकी वाढ केल्याने हा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे. त्यामुळे खत दरवाढीविरोधात आता विविध संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे.

डीएपीचा सर्वाधिक वापर
डीएपी हा रासायनिक खत शेतकरी सर्रास वापरतात. अर्थात, डीएपीला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे या खताच्या किमतीत अत्यल्प वाढ करायला हवी होती. मात्र, केंद्र सरकारने डीएपीच्या दरात आतापर्यंतच्या काळातील सर्वाधिक म्हणजेतब्बल ६० टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे डीएपीची ५० किलोची पिशवी आता १२०० रुपयांऐवजी २ हजार रुपयांना मिळणार आहे. युरिया, अमोनियम सल्फेट, एमपीएस, एसपी दाणेदार आदी खतांमध्येदेखील अशीच वाढ झाली आहे. त्यामुळे शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रथमच उच्चांकी वाढ
मोदी सरकार सातत्याने शेतक-यांचे गोडवे गाताना दिसत आहे. मात्र, धोरण शेतकरीविरोधी असल्याचे चित्र वेळोवेळी समोर येत आहे. मागच्या तीन-चार वर्षांत दरवर्षी खतांच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. २०१८ मध्ये युरियाच्या ४५ किलोच्या पोत्याची किंमत २६० रुपये होती तर ५० किलो युरियाची किंमत २९५ रुपये होती. त्यावेळी खतांच्या किमतीत १० टक्के दरवाढ केली. त्यानंतर मार्च २०१९ मध्ये पुन्हा एकदा रासायनिक खताच्या दरात ५० टक्क्यांहून अधिक दरवाढ झाली. आता २०२१ मध्ये तर उच्चांकी म्हणजे तब्बल ६० टक्क्यांवर किमती वाढल्या.

शेतकरी नेते करणार आंदोलन!
आधीच इंधन दरवाढीचा फटका बसला असताना त्यात खत दरवाढीची भर पडली आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेती तोट्याची बनली आहे. आता नव्या दरवाढीने शेतकरी आणखी कर्जात बुडणार आहे. त्यामुळे या दरवाढीविरोधात शेतकरी नेते आता रस्त्यावर उतरणार आहेत.

स्वाभिमानी उद्या रस्त्यावर उतरणार
केंद्राने लागू केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असून, २० मे रोजी केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज केली. तसेच बुधवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवाढ मागे घेण्यासंदर्भात लाखो शेतकरी पत्रही लिहतील, असे सांगण्यात आले.

सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या