मुंबई : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयुमध्ये लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण देशभरात याघटनेनंतर दु:ख व्यक्त करण्यात येत होते. आता त्या घटनेप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आला असून त्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी २ नर्सवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला आहे.
तपास अधिका-यांनी ५० पानांचा अहवाल राज्यसरकारला सादर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार आहे.भंडारा रुग्णालयातील आगीनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली होती. त्यांनी हा अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घटना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयात स्टाफ कमी होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या घटनेबाबत रुग्णालयातील कर्मचा-यांकडे बोट दाखवण्यात आलं आहे.
दरम्यान अहवाल आल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढील कारवाईबाबत माहिती दिली. अहवालाचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अहवाल सादर केला जाईल. अहवालाच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणा-यांना शिक्षा होईलच, मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी संपुर्णपणे प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही टोपे यांनी दिले.
अहवालातील निष्कर्ष
– आग शॉर्ट सर्किटमुळे लागली
– आग लागली तेव्हा संबंधित वॉर्डमध्ये कोणीही उपस्थित नव्हते.
– दुर्घटनेसाठी दोन नर्स आणि काही वरिष्ठ अधिकारीही जबाबदार
– रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नाही
वापरकर्त्यांचा संभ्रम दूर करण्यास तयार