26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रतब्बल १४ वर्षांनंतर आगपेटी महागणार

तब्बल १४ वर्षांनंतर आगपेटी महागणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या सगळीकडे महागाईचा परिणाम दिसून येत आहे. घरातील छोट्याशा वस्तूपासून ते दैनंदिन वापरातील महत्वाच्या वस्तूंचेही दर वाढले आहेत. त्यामध्ये आता काडीपेटी म्हणजेच माचिस बॉक्सचाही समावेश झाला आहे. १४ वर्षांनंतर माचिसचे दर वाढले आहेत. यापूर्वी १ रुपयाला मिळणा-या माचिसची किंमत आता दुप्पट झाली आहे. माचिस बनवणा-या कंपन्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. नवी किंमत १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.

याआधी २००७ मध्ये माचिसच्या दरात बदल झाला होता. त्यावेळी त्याची किंमत ५० पैशांनी वाढवून १ रुपया करण्यात आली होती. दर वाढवण्याचा निर्णय ऑल इंडिया चेंबर ऑफ माचिसने घेतला आहे. अलीकडच्या काळात कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे माचिसच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उद्योग क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे. एक माचिस बनवण्यासाठी १४ वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची गरज असते. यातील अनेक घटकांची किंमत दुप्पट झाली आहे, असे उत्पादकांचे म्हणणे आहे.

कच्च्या मालाची दुप्पट किंमत
लाल फॉस्फरसचा दर ४२५ रुपयांवरून ८१० रुपयांवर पोहोचला आहे. मेणाचा भाव ५८ रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढला आहे. आऊटर बॉक्स बोर्डची किंमत ३६ रुपयांवरून ५५ रुपये झाली आहे. इनर बॉक्स बोर्डची किंमत ३२ रुपयांवरून ५८ रुपये झाली आहे. याशिवाय कागद, स्प्लिंट, पोटॅशियम क्लोरेट, सल्फरसारख्या पदार्थांच्या किमतीतही ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यात वाढल्या आहेत. या सर्व कारणांमुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिबंडल दरात ६० टक्के वाढ
नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे सचिव व्ही. एस. सेथुराथिनम म्हणाले की, उत्पादक सध्या २७०-३०० रुपयांना ६०० मॅचबॉक्सचे बंडल विकत आहेत. प्रत्येक माचिसमध्ये ५० काड्या (प्लीहा) असतात. आम्ही ६० टक्क्यांनी किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही ४३०-४८० रुपये प्रतिबंडल दराने माचिस विकू. यामध्ये १२ टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्च वेगळा आहे.

प्रवासी, मालवाहतूक महागली
देशात इंधनाचे दर उच्चांकावर गेले आहेत. त्यात डिझेलचा दर प्रतिलिटर १०० रुपयांवर गेल्याने राज्यात आणि देशभरात प्रवासी आणि मालवाहतूक महागली आहे. यामुळे अन्नधान्ये, भाज्या, फळे याच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. टॅक्सीचालक, खाजगी वाहतूक, शाळांच्या बसेसही आता दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तर चार दिवसांपूर्वीच भाडेवाढ केली आहे. देशातील १४ राज्यांत डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या