मोर्शी : सध्या राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही शेतक-यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे आपल्या शेतात पेरणीसाठी जमिनीची मशागत करत असल्याचे दिसून आले. देवेंद्र भुयार यांनी थेट शेतात जात सारे फाडण्याकरता औत हाती घेतल्याचे दिसले.
यावेळी त्यांनी पहिली शेती, नंतर समाजकारण, राजकारण अशी आमची सामाजिक जीवनातील व्याख्या असल्याचे सांगितले.
दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत विविध पक्षांचे आमदार मुंबई किंवा बाहेरच्या राज्यात असताना दुसरीकडे आमदार देवेंद्र भुयार यांनी आपल्या शेतात औत धरल्याचे दिसले. आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे.
त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याचे भुयार म्हणाले. महाराष्ट्राची भूमी ही पवित्र भूमी आहे. पहिली शेती, नंतर समाजकारण, राजकारण अशी आमची सामाजिक जीवनातील व्याख्या असल्याचे भुयार यांनी यावेळी सांगितले. शेती ही फार महत्त्वाची आहे. शेतीत राबणं खूप गरजेचं असल्याचे भुयार म्हणाले.
मी शेतकरी असल्यामुळे सालाबादप्रमाणे शेतात राबतो. त्यामुळे याहीवर्षी मी शेतात पेरणी करत असल्याचे भुयार यांनी सांगितले. यावर्षी देखील शेतक-याच्या घरात भरभराटीचे पीक यावे यासाठी वरुणराजाला साक्षी ठेवून आम्ही पेरणी करत असल्याची माहिती भुयार यांनी दिली.