22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ६(प्रतिनिधी) सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८५, तर पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आघाडीने बाजी मारली आहे. भाजपाला सर्वाधिक २२ जागा मिळाल्या असल्या तरी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत त्याच्या सात जागा कमी झाल्या आहेत. भाजपा पाठोपाठ काँग्रेसने १९, राष्ट्रवादीने १५, तर शिवसेनेने १२ जागा जिंकल्या आहेत. पंचायत समित्यांच्या १४४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ३६ जागा जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यामुळे धुळे, नंदुरबार, अकोला वाशिम नागपूर व पालघर या सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८५, तर पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष काही ठिकाणी आघाडी करून, तर काही ठिकाणी स्वबळावर लढले होते. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले जात होते. त्यामुळे मतदार काय कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. निकाल संमिश्र असले तरी रद्द झालेल्या जागा व पोटनिवडणुकीत पुन्हा निवडून झालेल्या जागांचा विचार करता भाजपाला सात जागांचा फटका बसला आहे. तर काँग्रेस व शिवसेनेला अनुक्रमे सहा व तीन जागांचा फायदा झाला आहे. राष्ट्रवादीचे १६ सदस्य अपात्र ठरले होते व १५ जागा पोटनिवडणुकीत निवडून आल्या आहेत.

पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस नंबर वन
पंचायत समित्यांच्या १४४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ३६ जागा जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपाला ३३ जागा मिळाल्या असून शिवसेना २३ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १८ जागा मिळाल्या आहेत. अन्य पक्षांना २५ जागा मिळाल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या