23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रबालेकिल्ल्यालाच भगदाड?

बालेकिल्ल्यालाच भगदाड?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून, ३५ आमदारांसह ते सुरतमध्ये दाखल झाले असून, त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, असा आग्रह धरीत बंडाचे निशाण फडकावले आहे. यामध्ये मराठवाड्यातील तब्बल ९ आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात शिवसेनेचे ६ आमदार आणि २ मंत्री आहेत. तेदेखील शिंदे यांच्यासोबत आहेत. तसेच उस्मानाबादमधील २, नांदेडमधील एक आमदारही शिंदेंसोबत असल्याने बंड यशस्वी झाल्यास थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पडू शकते.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्याची चर्चा रंगलेली असतानाच शिवसेनेचे आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावत सोमवारी रात्रीच आपल्या समर्थक आमदारांसह सुरत गाठले आणि तेथे त्यांच्यासोबत जवळपास ३४ ते ३५ आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ६ शिवसेना आमदार आहेत. मुंबईनंतर शिवसेनेची सर्वाधिक ताकद औरंगाबादेत आहे. औरंगाबाद शहरातील २ आमदारांसह सिल्लोड, वैजापूर, पैठण आणि कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. यात पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद आहे. मात्र, हे सर्वच मंत्री, आमदार शिंदेसोबत गेल्याने बालेकिल्ल्याच हादरा बसल्याचे मानले जात आहे. याचा आगामी मनपा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो.

यासोबतच उस्मानाबाद जिल्हाही शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यातही भूम-परांडा आणि उमरगा येथे शिवसेनेचे आमदार आहेत. हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या शिवसेनेच्या गडालाही धक्का लागू शकतो. तसेच नांदेड जिल्ह्यातील शिवसेना आमदारही नॉट रिचेबल आहेत. तेदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या बंडानंतर मराठवाड्यातील शिवसेनेची मोठी हानी होऊ शकते.

मराठवाड्यातील हे आहेत ९ आमदार
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभेचे उदयसिंह राजपूत, औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे संजय शिरसाट, वैजापूर विधानसभेचे रमेश बोरणारे, औरंगाबाद मध्य विधानसभेचे प्रदीप जैस्वाल, सिल्लोड विधानसभेचे अब्दूल सत्तार, पैठण विधानसभेचे संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, तर नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हेही शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात असून, ते नॉटरिचेबल आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हेही बंडखोरांसोबत असल्याचे सांगितले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या