21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रविदर्भात महापूर

विदर्भात महापूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या २४ तासांत वर्धा जिल्ह्यात सुमारे १३६ मिलीमीटर पाऊस कोसळला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या भागात मुसळधार पावसामुळे अनेकजण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तेथे तात्काळ बचावकार्य सुरू करून संकटात सापडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करण्यात येत आहे.

कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. गडचिरोली जिल्ह्यात २४ तासांत ११३ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. गोदावरी आणि इंद्रावती नदी धोका पातळीच्यावरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक मार्ग बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत १० हजार ६०६ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच ३५ मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या ७३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

अमरावतीत अतिवृष्टी, मोठा पूल गेला वाहून
अमरावतीत पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत ७ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने चारगड नदीला पूर आला आहे. या पुरामुळे राज्य महामार्ग क्रमांक ३६५ वरील चारगड नदीवरील पूल वाहून गेला. यामुळे परतवाडा ते घाटलाडकीमार्गे मोर्शी हा रस्ता वाहतुकीकरिता बंद केला आहे. दरम्यान, अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दरवाजे उघडण्यात आली.

दक्षिण गडचिरोलीत पूर
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड, हेमलकसा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोलीत पूर कायम असल्याने २३४५ लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. भामरागड परिसरातही पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या