25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये रेस्क्यू ऑपरेशनद्वारे ६५ बेघरांची सुखरूप सुटका

नाशिकमध्ये रेस्क्यू ऑपरेशनद्वारे ६५ बेघरांची सुखरूप सुटका

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक शहरासह गंगापूर पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोदाकाठालगत असलेल्या महापालिकेच्या बेघरांच्या निवासस्थानात पुराचे पाणी शिरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पूर परिस्थिती निर्माण होण्याआधी येथून ६५ बेघरांना सुखरूप बाहेर काढले आहे.

मागील तीन दिवसांपासून नाशिक शहराला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे गोदावरीला पूर आला आहे. काल पुराच्या पाण्यात वाढ झाल्यानंतर गोदाकाठालगत असलेल्या संत गाडगे महाराज धर्मशाळेला लागून महापालिकेने सुरू केलेले निराश्रितांच्या निवासस्थानात पुराचे पाणी शिरले.

अधिकच्या पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी निराश्रित निवासस्थानात एकूण ६५ वयोवृद्ध पुरुष-महिला बेघर व्यक्ती आश्रयास होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्यांना सुरक्षितरीत्या पाय-यांच्या माध्यमातून गाडगे महाराज मठापर्यंत आणत सुटका केली.

पंचवटीतील गोदाकाठ परिसरात नेहमी वर्दळ असते. परिसरात मोठ्या संख्येने भिक्षेकरी, बेघर, दिव्यांग व्यक्तींचा वावर असतो. नाशिक महापालिकेने गाडगे महाराज धर्मशाळेला लागून निराश्रित बेघरांचे निवासस्थान उभारले आहे. या निवारागृहात वयोवृद्ध, पुरुष, महिला वास्तव्यास होत्या. सद्यस्थितीत गंगेला पूर आला असल्याने नदीकाठच्या व्यावसायिकांना, नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. काल सकाळी गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असताना अचानक निवारागृहात ६५ निराश्रित अडकून पडल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली.

त्यानुसार नाशिकचे अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, लीडिंग फायरमन इकबाल शेख, दत्ता गाडे, सोमनाथ थोरात, अनिल गांगुर्डे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दिव्यांग, बेघर वयोवृद्धांना त्यांच्या सामानासह स्ट्रेचरवर तर काहींना कडेवर उचलून जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या