30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home महाराष्ट्र साडेचार वर्षे तरी ‘फाईन मॉर्निंग’चा मुहूर्त नाही

साडेचार वर्षे तरी ‘फाईन मॉर्निंग’चा मुहूर्त नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘‘महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात नाही,’’ असा दावा करत शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबईत एका हॉटेलात भेट झाली. त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आले होते. राऊत व फडणवीस या दोघांनीही यात राजकीय काही नसल्याचा खुलासा केला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य करून या भेटीचे गूढ वाढवले होते. ‘दोन वेगळ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या भेटीत चहा-बिस्किटाची चर्चा होणार नाही. त्यात राजकीय विषय होते. ‘वन फाईन मॉर्निंग’ राज्याच्या राजकारणात काहीतरी घडेल, असे पाटील म्हणाले होते.

पाटील यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे. ‘फडणवीस व राऊत यांच्या अचानक भेटीमुळे एखाद्या फाईन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साईन’ नाही. एकतर अशा फाईन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे, पण त्या फाईन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या ७२ तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त देवेंद्रबाबूंनाच आहे. भाजपला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही पण हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे फडणवीस सांगत आहेत व त्याचवेळी एखाद्या फाईन मॉर्निंगला ‘काहीतरी’ घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे?,’ असा सवाल शिवसेनेने केला आहे.

‘आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे, असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे. म्हणजे या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळते आहे. मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर ‘घडाळ्या’चे काटे गतिमान आहेत. यावेळी वेळा चुकणार नाहीत. सोबतीला हात आहे. हातावर घड्याळ आहे व घड्याळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित दादांनी आता गजराचे नाही तर टोलांचे घड्याळ भिंतीवर लावले आहे व ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच ‘जागते रहो’च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न,’ असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे.

दादा, दचकू नका
‘राज्यात प्रश्नांचे डोंगर निर्माण झाले असताना राजकारणात उगाच फुसकुल्या सोडून प्रदूषण निर्माण करणे हे प्रगल्भतेचे लक्षण नाही. पाच वर्षे राज्य फडणवीस-पाटलांनीही चालवले आहे. त्यामुळे संकटकाळात काय करायचे व काय नाही याचे भान त्यांना असायला हवे. पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. शांत झोप लागणे हे ‘फाईन’ प्रकृतीचे लक्षण आहे. कधीच पूर्ण न होणा-या स्वप्नांचा पाठलाग करणे हे कायम अशांत राहणा-या मनाचे लक्षण आहे. दादा, दचकू नका,’ असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

2 ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी समर्थन व संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या