24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी; आमदार पुन्हा पंचतारांकित नजरकैदेत!

विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी; आमदार पुन्हा पंचतारांकित नजरकैदेत!

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ आता सोमवारी होणा-या विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला झटका देण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर राज्यसभेच्या अनुभवामुळे अधिक सतर्क झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाची मते फोडून राज्यसभेचे उट्टे काढण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. फोडाफोडी होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूनी आपल्या आमदारांना शनिवारीच मुंबईत बोलावले असून, पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यसभा निवडणुकीत आघाडीच्या छावणीतील छोट्या पक्षांना व अपक्षांना गळाला लावून भाजपाने ३ जागा जिंकण्यात यश मिळवले होते. आता २० तारखेला विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत असून ११ उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक गुप्त मतदानाने होत असल्याने आमदारांना खेचण्यासाठी जोरदार रस्सीखेच होणार अशी चिन्हे आहेत. या निवडणुकीत विजयासाठी २७ आमदारांचे पाठबळ लागणार असून विधानसभेतील संख्याबळानुसार आघाडीच्या पाच व भाजपाच्या चार जागा निवडून येऊ शकतील. सहाव्या जागेसाठी आघाडीला १० मतांची आवश्यकता आहे, तर सगळीच्या सगळी मते बाहेरून मिळवण्याचे उद्दिष्ट ठेऊन भाजपाने पाचवा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे दहाव्या जागेसाठी जोरदार चुरस आहे.

या निवडणुकीत राज्यसभेचे उट्टे काढण्यासाठी आघाडीकडूनही प्रयत्न होतील हे लक्षात घेऊन भाजपही अधिक सतर्क आहे. पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ताजमहलमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीने ट्रायडेंट व शिवसेनेने वेस्टईन या हॉटेलात आपल्या आमदारांची व्यवस्था केली आहे.

रामराजे निंबाळकर ठाकूर यांच्या भेटीला
विधान परिषद निवडणुकीसाठी आता अपक्ष आमदार, छोट्या पक्षांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू असून, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन मनधरणीचा प्रयत्न केला. विवा कॉलेजमध्ये दोघांत बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.

नवाब मलिक, अनिल देशमुखांबाबत आज निर्णय
सध्या तुरुंगात असलेल्या माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची मुभा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत न्यायालय शुक्रवारी आपला निर्णय देणार आहे.

अपक्ष आमदार पुन्हा फुटणार?
अडीच वर्षात अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री भेटले नाहीत. त्यांची समस्या ऐकली नाही. त्यामुळे त्यांनी कोणतीही योजना आखली तरी ती कामी येणार नाही. त्यांची मते फुटतील. अशी योजना आखली आहे. या योजनेला जुळून आम्ही काम करीत आहोत, असे रवी राणा म्हणाले. त्यामुळे विधान परिषदेतही अपक्ष आमदार फुटण्याची शक्यता आहे.

भाजपाचे मिशन ४५
लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्ष अवकाश असला तरी भाजपाने पूर्वतयारी सुरू केली आहे. राज्यात किमान ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेऊन मिशन-४५ सुरू करण्यात आले असून, शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या १८ मतदारसंघांवर भाजपाचे विशेष लक्ष असणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या