21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल ११ वेळा निवडून येऊन ५४ वर्षे प्रतिनिधित्व करणारे गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सर्वाधिकवेळा निवडून येणारे आमदार म्हणून ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या नावावर राज्य विधानसभेत नोंद आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी वृद्धत्वामुळे निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ते निवडणूक रिंगणात नव्हते. त्यापूर्वी ते तब्बल ११ वेळा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघांतून निवडून आले. त्यांनी राज्य विधानसभेत सांगोल्याचे ५४ वर्षे प्रतिनिधित्व केले. परंतु त्यांनी कधीच कुठे बडेजाव मिरवला नाही. उलट साधी राहणी आणि उच्च विचार या भूमिकेत ते कायम जगले. ते आमदार असूनही सातत्याने एसटी प्रवास करीत होते. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्येही सहभागी होते. गणपतराव देशमुख यांनी २००९ मध्ये दहाव्यांदा विजय मिळवित तामिळनाडूचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांची बरोबरी साधली होती. त्यानंतर २०१४ मध्ये ते ११ व्यांदा निवडून आले आणि करुणानिधींची विक्रम मोडित काढला.

गणपतराव देशमुख यांचा जन्म १९२६ सालचा. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील पेन्नूर हे त्यांचे गाव. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुढील शिक्षणही पुण्यातच पूर्ण केले. त्यावेळी ते काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार आणि गणपतराव देशमुख रूममेट होते. स्वातंत्र्यानंतर राजकारणात पाऊल टाकत त्यांनी १९६२ ची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते सांगोल्याचे आमदार झाले. आमदार होऊन पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या गणपतरावांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणाबद्दल यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांचे कौतुक केले होते.

सात्विक विचारसरणीचे व्यक्तिमत्व हरपले मुख्यमंत्र्यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली
राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली.

ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. कष्टकरी-शेतक-यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती, असेही ते म्हणाले.

गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी विरळाच
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरेच विरळा म्हणावा लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.

अतानू दासची आगेकूच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या