27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र फऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे निधन

महाराष्ट्र फऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील विविध सामाजिक चळवळींना पाठबळ देणारे महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे निधन झाले. मूळचे सांगलीचे रहिवासी असलेले सुनील देशमुख पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि पुढे तेथेच स्थायिक झाले. मात्र, अमेरिकेत राहूनही त्यांना महाराष्ट्रातील मातीची ओढ कायम राहिली आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून त्यांनी मोठं काम केले.

सुनील देशमुख अमेरिकेत पर्यावरण संरक्षणासाठी काम करणा सर्वांत जुन्या ‘सियारा क्लब’ संस्थेचे सक्रिय सभासद होते. सियारा क्लबमार्फत भारतामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाचे काम करणा-या संस्थांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार देण्याच्या योजनेचे शिल्पकार म्हणूनही सुनील देशमुख यांना ओळखलं जातं. ते या पुरस्कारासाठीच्या निधी संकलन समितीचे प्रमुख होते. देशमुख यांनी महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील ‘टाइम स्क्वेअर’मध्ये अमेरिकेच्या माजी सचिव हिलरी क्लिंटन यांच्याबरोबर ‘फुल वीक सॅल्यूट’चा सन्मान मिळाला.

मराठी भाषा, समाज व संस्कृती याबद्दल सुनील देशमुख यांना विशेष प्रेम व कळकळ होती. हे ऋण फेडण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी दिली. तसेच १९९४ पासून महाराष्ट्र फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी साहित्य पुरस्कार सुरू केले. १९९६ पासून सामाजिक कार्य पुरस्कार योजनेसाठीही त्यांनी तेवढ्याच रकमेची व्यवस्था केली. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध पुरोगामी चळवळींना आर्थिक सहाय्य केलं.

सुनील देशमुख यांनी १९६४ मध्ये सांगलीमध्ये दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत ते बोर्डात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. १९७० मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून बी. केम. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या