22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रफॉक्सकॉन गुजरातला पळविली

फॉक्सकॉन गुजरातला पळविली

एकमत ऑनलाईन

मुंबई : १.५४ लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून राज्यातील एक लाख कुशल तरुणांना नोक-या मिळणार होत्या. वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. ही कंपनी थेट गुजरातला पळविली गेल्याने शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कंपनीसोबत तीनवेळा बैठका झाल्या होत्या. जवळपास सर्व मुद्यांवर सहमती झाली होती. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिका-यांची जुलै महिन्यात अंतिम बैठक झाली. मात्र, आता हा उद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये सुरू होणार आहे.

सेमीकंडक्टर निर्मिती देशात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. आगामी काळात सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत विशेष धोरण आखले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता सोबत झालेल्या चर्चेनुसार सेमीकंडक्टरचा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे ८० हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील ३० टक्के रोजगार थेट होता, तर जवळपास ५० टक्के रोजगार अप्रत्यक्ष होता.

वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात ३ टप्प्यांत प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. या उद्योगामुळे महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ झाली असती. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळी मजबूत होऊन १५० हून अधिक कंपन्या गुंतवणुकीचा भाग झाल्या असत्या. मात्र, आता हा उद्योग गुजरातमध्ये गेल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

स्वत:साठी खोके, राज्याला धोके
वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये गेला आहे. जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी सांगावे की, हा प्रकल्प शेवटच्या क्षणी महाराष्ट्राच्या हातून का गेला, स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे यांचे झाले आहे. अशी टीका माजी मंत्री युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

तातडीने हस्तक्षेप करा
दीड लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये नेला जात आहे. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून राज्याबाहेर जाणारी गुंतवणुक थांबवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

तोंडचा घास हिरावून नेला
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून नेला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला. राज्यातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याने शिंदे-फडणवीस तरुणांची माफी मागतील का, असा प्रश्न उपस्थित केला.

राज्याच्या तरुणांनी काय दहिहंड्या फोडायच्या का?
सरकार बदलताच प्रकल्प गुजरातमध्ये गेला, याचे गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. यातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील तरुणांनी फक्त दहिहंड्या फोडायच्या का, असा संतप्त सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

उद्योगमंत्र्यांची सारवासारव
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यातून एक कंपनी गेली असली तरी त्यापेक्षा तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याची ताकत असल्याचे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या