27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्र१५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम

१५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम

एकमत ऑनलाईन

मुंबई : पाऊस चांगला झाल्याने राज्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, १३८ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सर्व उसाचे गाळप व्हावे, यासाठी १५ ऑक्टोबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा गाळप होणा-या उसासाठी १०.२५ टक्के बेसिक उता-यासाठी प्रतिमेट्रिक टन ३ हजार ५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतक-यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. यंदा राज्यात सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी ९५ टन प्रतिहेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. इथेनॉल निर्मितीत देशात महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. पुढील वर्षी ३२५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.

यंदा २०३ कारखाने सुरू होणार
यंदाच्या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून यंदा १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे. यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणा-या उसासाठी १०.२५ टक्के बेसिक उता-यासाठी प्रति मेट्रिक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

देशात ६० लाख मेट्रिक टन साखरेचा साठा
देशात सध्या ६० लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रिक टन आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या