22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

एकमत ऑनलाईन

सिंधुदुर्ग : कोकणातील सर्वांत मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. मात्र कोकणात येणा-या कोकण रेल्वे गाड्यांचे गणेशोत्सवाच्या काळातील आरक्षण फुल्ल झाले आहे. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान अनेक गाड्यांची सर्व श्रेणीतील आसने आरक्षित झाली आहेत.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांत गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे जाता न आल्यामुळे चाकरमान्यांनी यंदा उत्सव सुरू होण्याआधीच कोकणात जाणा-या रेल्वे गाड्यांचे तिकिट आरक्षित केले आहे. कोकणात जाणा-या गाड्यांच्या आरक्षणाचा प्रयत्न करताच प्रतीक्षा यादी अधिक झाल्याने रेल्वेने आरक्षण देणेच बंद केले आहे.

काही गाड्यांना तर मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा यादी असल्यामुळे यंदा मध्य रेल्वे, कोकण आणि पश्चिम रेल्वेला मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडाव्या लागतील. तर एसटी महामंडळालाही तसे नियोजन करावे लागणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईसह अन्य भागातून तीन ते चार दिवस आधीच कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यासाठी कोकण रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार महिने आधीच फुल्ल झाले आहे.

कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे शहरी भागातला चाकरमानी हा हमखास आपली कामं सोडून किंवा कामावरच्या सुट्या घेऊन तो गणपतीला आणि शिमग्याला हजेरी लावतो. कोरोनामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायला मिळाला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षात कोरोनाचे विघ्न दूर झाले असून अनेकांनी आधीच तिकिट बुक केल्याने कोकण रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या