30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रकोरोनापुढे गडकरी हतबल!

कोरोनापुढे गडकरी हतबल!

एकमत ऑनलाईन

नागपूर : राज्यासह देशभरात कोरोनाची मोठी लाट आली आहे. तिला थोपविण्यासाठी अनेक ठिकाणी संचारबंदी, नाईट कर्फ्यु असे निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोनाचा आकडा देशभरात रोज लाखोंच्या संख्येने वाढत आहे. तसेच मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावरुन केंद्रसरकार राज्यांना विविध सूचना देत आहे. अद्यापही केंद्राने देशात लॉकडाऊन लावण्याबाबत नकार दर्शवला आहे. एकीकडे केंद्र सरकार आपल्या मतावर ठाम असताना दुसरीकडे केंद्रीय सार्वजनिक वाहतुकमंत्री नितीन गडकरींनी हतबलताच व्यक्त केली आहे. देशात वाढणा-या कोरोना संसर्गाला घरेच्या घरे बळी पडत आहेत. परिस्थिती विदारक असून पुढे काय होईल, हे सांगणे अशक्य आहे, असे वक्तव्य त्यांनी व्यक्त केले आहे.

नागपुरमध्ये आज राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये १०० बेडच्या कोरोना हॉस्पिटलचे अनावरण केले. यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे घरेच्या घरे बाधित झाली आहेत. पुढे काय होईल हे सांगणे उचित नाही. हे कोरोना संकट किती काळ चालेल आणि किती मोठे रुप घेईल हे काहीच सांगता येत नाही. पुढच्या १५ दिवसांत किंवा महिनाभरात काय होईल हे सांगता येणार नाही. यामुळे चांगल्याचा विचार करणे आणि वाईटाचा मुकाबला करण्यासाठी तयारी करणे गरजेचे आहे. हॉस्पिटलनी युद्धपातळीवर काही काम करावे. पुढे मागे काही घडले, घडू नये. परंतू त्यासाठी तयार रहायला हवे, असे गडकरी म्हणाले. गडकरींच्या या वक्तव्यातून देशातील कोरोना संकटाची भीषणताच समोर आली असून एकप्रकारे केंद्र सरकारही हतबल होत असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य यंत्रणेवर वाढता ताण
देशात वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच आरोग्ययंत्रणांवरही मोठा ताण येत आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत. नवीन रुग्णांना बेड मिळत नाहीत. बेड मिळालेल्यांना ऑक्सिजनची सुविधा मिळत नाही आहे. उपचारासाठी रेमडिसीवर हे इंजेक्शनही सध्या मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी रोज हजारांच्यावर मृत्यू होत आहेत.

भारतात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण
एवढेच नाही तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी सूचनावजा ताकीद केंद्र सरकारकडून राज्यांना दिली जात आहे. मात्र दुसरीकडे देशात अनेक राज्यांत कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे.अनेक राज्यांत मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग आहे. एकाच सरणावर अनेक मृतदेह जाळण्याची वेळ आली आहे.अशी एकप्रकारची युद्धसदृष्य परिस्थितीच भारतात उद्भवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना आपत्ती घोषित करण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. या सा-या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

५ दिवसांत परिस्थिती सुधारेल : फडणवीस
हॉस्पिटलच्या अनावरण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील बेडची संख्या २०० पर्यंत लवकरच वाढविण्यात येणार आहे. ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी गडकरी प्रयत्न करत आहेत. पुढील ४-५ दिवसांत नागपुरातील ऑक्सिजन आणि बेडची परिस्थिती सुधारेल,असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच गरज असलेल्यांनाच बेड आणि रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

नवर्याच्या मृत्युची बातमी कळताच, एका मुलासह पत्नीने तळ्यात उडी मारून केली आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या