22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रगणेशमूर्ती १५ ते २० टक्क्यांनी महागणार!

गणेशमूर्ती १५ ते २० टक्क्यांनी महागणार!

एकमत ऑनलाईन

मुंबई : अलिकडे सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, खाद्य तेलासह जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यातच अलिकडे दैनंदिन लागणा-या ब-याच वस्तूंच्या जीएसटीत वाढ झाल्याने पुन्हा जगणे महाग झाले. त्यातच आता गणेशोत्सवाची चाहुल लागलेली असतानाच यंदाच्या सणोत्सवात महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. अर्थात, माती, रंग, कारागीरांचा खर्च वाढल्याने गणेशमूर्ती १५ ते २० टक्क्यांनी महागण्याची शक्यता खुद्द मूर्तीकारच व्यक्त करीत आहेत.

दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला. त्यामुळे सर्वत्र निर्बंध लावले गेले. यातून संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. त्यावेळी सर्व नियमांचे पालन करून सण-उत्सव साजरे करावे लागले. पण यंदा सर्व निर्बंध उठविले गेले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात गणेशोत्सवही उत्साहात साजरा होणार आहे. मात्र, महागाईमुळे आता रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी महागण्याची चिन्हे आहेत, असे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.

यंदा गणेश उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारनेही तसे जाहीर केले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांनंतर प्रथमच यंदा गणेशोत्सवासह इतर सण-उत्साहात साजरे करता येणार आहेत. दरम्यान, पुढील महिन्यात गणेशोत्सव असल्याने सध्या मूर्तींना आकार देण्याचे काम सुरू आहे. सध्या मूर्तिकारांची ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सध्या गणेश भक्तांसह लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाची सावट असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह कमी होता. त्याचबरोबर याचा अंदाज घेऊन मूर्तिकारांनी मूर्ती कमी केल्या होत्या. मात्र, यावर्षी मूर्तिकारांनी दुपटीने गणेश मूर्ती वाढवल्या आहेत. यामुळे बाजारात विविध प्रकारच्या मूर्ती बघायला मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

माती, रंगाच्या किमती वाढल्या
गेल्या वर्षी माती ७० रुपये किलो मिळत होती. मात्र, यावर्षी तिच्या किमतीत वाढ होऊन आता ती २०० रुपये किलो मिळत आहे. तसेच रंगाची बकेट अगोदर ४ हजार ५०० रुपयांना मिळत होती. त्यासाठी आता ५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. यासोबतच कारागिरांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मूर्तींच्या किमतीवर होणार आहे.

महागाईच्या झळा तीव्र
अगोदरच कोणत्या ना कोणत्या रुपात महागाईचे भूत सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसलेले आहे. एक तर अत्यावश्यक वस्तूंसह सर्वच वस्तूंच्या किमती वाढत आहेत. या वाढत्या महागाईचा परिणाम गणेश उत्सवावरही होणार आहे. अर्थात, मूर्तींसह सर्वच वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे सणोत्सवात महागाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या