नवी दिल्ली : १४ सप्टेंबरपासून सुरू होणा-या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात प्रभावी कामगिरी करण्याच्या उद्देशाने कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभा आणि लोकसभेच्या पाच-पाच सदस्यांची टीम तयार केली आहे. यात कॉंग्रेसचा नवा चेहरा गौरव गोगोई यांना लोकसभेचे उपनेते, तर रवनीतसिंह बिट्टू यांना उपप्रतोद म्हणून नियुक्त केले आहे. तसेच राज्यसभेत ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल याच्याकडे जबाबदारी दिली असून, जयराम रमेश यांच्याकडे राज्यसभेचे मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी दिली आहे.
सध्या अधीर रंजन चौधरी हे कॉंग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते आहेत. के. सुरेश मुख्य प्रतोद, केरळचे खासदार मनिक्कम टॅगोर उपप्रतोद आहेत. गौरव गोगोई हे आतापर्यंत उपप्रतोद होते. आता त्यांच्याकडे उपनेत्याची जबाबदारी सोपविली आहे. आतापर्यंत लोकसभेत उपनेता नव्हता. गौरव गोगोई आसाममधील कलियाबोरचे खासदार आहेत. तेथे पुढील वर्षात निवडणुका होणार आहेत. ते माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत, तर पंजाबमधील लुधियानाचे खासदार रवनीतसिंह बिट्टू यांच्याकडे उपप्रतोद म्हणून जबाबदारी दिली आहे. राज्यसभेत गुलाम नबी आजाद, आनंद शर्मा आणि जयराम रमेश अनुक्रमे विरोधी पक्षनेते, उपनेता आणि मुख्य प्रतोद या पदावर कायम असतील. उत्तम समन्वयासाठी अहमद पटेल आणि वेणुगोपाल यांचा पाच जणांच्या समितीत समावेश केला आहे.
१० खासदारांचे पॅनल
कॉंग्रेसच्या १० खासदारांचे एक पॅनल बनविण्यात आले आहे. त्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जयराम रमेश, अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, के. सुरेश, मनिकराम टॅगोर, रवनीतसिंह बिट्टू यांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या अध्यादेशावर विचार विनिमय करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीतून गुलाम नबी आजाद आणि आनंद शर्मा यांना वगळले आहे.
अर्थसंकट : जीडीपीच्या तुलनेत सरकारी कर्जाचा आकडा ९१ टक्क्यांवर जाणार