25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रयुध्दपातळीवर सज्ज व्हा ! - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्योगांना आवाहन

युध्दपातळीवर सज्ज व्हा ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्योगांना आवाहन

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग-व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून, तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी आणि आगामी धोका लक्षात घेता युध्दपातळीवर सज्ज व्हा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार दि़ १७ एप्रिल रोजी राज्यातील उद्योजकांच्या बैठकीप्रसंगी केले आहे.

कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल, तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे देखील आवाहन मुख्यमंत्र्यांनी शनिवारी उद्योगांना केले आहे. तर, यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला. दरम्यान, यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या तसेच उद्योगपतींना कोविडविषयक सुविधा उभारण्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे आश्वासन दिले़

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंव्दारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून राज्याला या काळात ज्या गोष्टींची गरज आहे त्यात पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. या बैठकीस उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एऩ सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल आदि उद्योगपती सहभागी होते.

उद्योगांचा टास्क फोर्स स्थापणार
राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले. बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगीतले.

उद्योगांनी ऑक्सिजन उत्पादन करावे
डॉ. प्रदीप व्यास यांनी सध्याची परिस्थिती किती गंभीर होत आहे याकडे लक्ष वेधले. तुलनेने मृत्यू दर कमी असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या ४० दिवसांवर आला आहे हे सांगून ते म्हणाले की, आपण दहा लक्ष लोकसंख्येत दररोज सुमारे ३ लाख चाचण्या करीत आहोत. उद्योगांनी त्यांच्या आवारात नवीन तंत्रज्ञानावर आधारित हवेतील ऑक्सिजन शोषून उत्पादन करणारे छोटे प्रकल्प सुरु करावेत तसेच उत्पादित ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी द्यावा असेही ते म्हणाले.

ऑक्सिजन उपलब्ध करून देणार
बैठकीत सर्व उद्योगपतीच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात जेएसडब्ल्यू , महिंद्र, गोदरेज, बजाज, रिलायन्स, टाटा, ब्ल्यू स्टार, एल एंड टी , इन्फोसिस, कायनेटिक इंजिनीअरिंग यांच्या प्रतिनिधींनी बोलताना विशेषत: ऑक्सिजन उपलब्धता करून देण्यात येईल, तसेच त्यांच्या उद्योगांच्या परिसरात चाचणी केंद्रे उभारणे, लसीकरण मोहिमा घेऊन जास्तीत जास्त कर्मचा-यांना सुरक्षित करणे यासाठी तातडीने पाउले उचल आहोत असे आश्वासन दिले. अनेक उद्योगांनी त्यांच्या परिसरात विलगीकरण सुविधा उभारत असल्याचेही सांगितले.

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या