मुंबई दि १४(प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. याबरोबरच सरकारने काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन केल्यापासून मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं बंद करण्यात आली होती. १ जूनपासून देशात अनलॉकिंगची व राज्यात मिशन बिगीन आगेनची प्रक्रिया सुरू करून एकेक निर्बंध शिथिल करण्यात येत होते. परंतु संसर्गाचा धोक्यामुळे राज्य सरकारने प्रार्थनास्थळं उघडण्याची अनुमती देण्याबाबत सावध भूमिका घेतली होती.
भाजपासह काही पक्ष व संघटनांनी यासाठी आंदोलनही केले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात अत्यंत खरमरीत पत्रही लिहले होते. परंतु कोणत्याही स्थितीत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याशिवाय प्रार्थनास्थळं उघडण्यास परवानगी देणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री व राज्य सरकारने घेतली होती. गेल्या काही कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची वाढ नियंत्रणात आले असून, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची तीन लाखांपर्यंत गेलेली संख्या कमी होऊन ८० हजारांच्या घरात आली आहे. त्यामुळे सोमवारी, पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली.
मार्गदर्शक सूचनांचे पालन करा !
प्रार्थनास्थळं सुरू करण्याची घोषणा करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षस हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही.
इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली आहे. कोरोनाकाळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद होती. पण डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मास्क घालूनच मंदिरात प्रवेश करा !
हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा आहे असे समजा ! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा नसतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.