गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याअंतर्गत निंबा जिल्हा परिषद शाळेत सकाळी १०च्या सुमारास एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना आढळून आले. शिक्षक जी. आर. मरसकोल्हे हे दारूच्या नशेत चक्क वर्गखोलीत जमिनीवर लोळत होते. त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले.
शिक्षक म्हटले की समाजाला आदर्श व्यक्तिमत्त्व घडवून देणारा चेहरा रेखाटला जातो. परंतु आदर्श घडवणा-या याच शिक्षकाने आपल्या पेशाला काळिमा फासला. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याच्या निंबा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि याच शाळेत जी. आर. मरसकोल्हे हे शिक्षक पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी रोजच्या वेळेवर शाळेत विद्यार्थी पोहोचले तेव्हा शिक्षक मरसकोल्हे हे एका वर्गात चक्क अस्त्यवस्थ अवस्थेत लोळत होते.
हे बघून विद्यार्थी घाबरले आणि अन्य शिक्षकांसोबत लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर शिक्षक मरसकोल्हे यांना उठवण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु ते इतके नशेत होते की, त्यांना उठता देखील येत नव्हते. अखेर रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मरसकोल्हे यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात रवाना केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक मरसकोल्हे यांना आधीपासूनच दारूचे व्यसन असून तीन वर्षांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा ही घटना झाल्याने निंबा गावच्या सरपंच वर्षा पटले, पंचायत समिती सदस्य राकेश पंधरे, बोजेवारसह गावकरी आणि पालकांनी पोलिस ठाणे गाठून शिक्षक जी. आर. मरसकोल्हेच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.