Saturday, September 23, 2023

गुगल क्लासरूमने राज्यात दूरस्थ शिक्षणाची सोय!

मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी पालक चिंता व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असा दावा राज्य सरकारने केला. याचा मला सार्थ अभिमान असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे अभिनंदन केले. यामुळे दुरस्थ शिक्षणाची सोय झाली आहे, असेही ते म्हणाले. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली.

या भागीदारीमुळे राज्यातील २.३ कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. यामुळे जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सूटच्या माध्यमातून शिक्षण देणा-या शिक्षकांना आणि शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षणात अग्रेसर राज्य बनविणार : गायकवाड
सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करून ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वर्क फ्रॉम होमसाठी गुगलने सहकार्य करावे
ळजे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री म्हणाले की, गुगलमुळे हे शक्य झाले आहे. भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल, यासाठीही गुगलने सहकार्य करावे.

गुगल व शालेय शिक्षण विभागाच्या प्रयत्न कौतुकास्पद
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. जी स्वीट आणि राज्य शाळांकरिता गुगल क्लास रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. गुगल क्लासरुम मध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात, असेही ते म्हणाले.

Read More  रम्य ते आरोग्यसंपन्न बालपण!

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या