मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर हा शिंदेंचा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे. तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
शिवसेनेतल्या बंडानंतर आता उद्धव ठाकरेही सावध झाले आहेत. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता ठाकरेंनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौ-यात ठाकरे शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करत राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कालच मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौ-यावर गेले होते. दिल्लीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटले. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाल्याचीही माहिती हाती येत आहे.
दरम्यान, या दिल्लीवारीनंतर शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. दादा भुसे, शहाजी बापू पाटील, सदा सरवणकर, संजय शिरसाठ, विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार मुख्यमंत्र्यांकडे गेले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये धाकधूक आहे.