22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रआरेतील मेट्रो कारशेडला वाढता विरोध

आरेतील मेट्रो कारशेडला वाढता विरोध

एकमत ऑनलाईन

मुंबई : मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून राजकारण तापू लागले आहे. मेट्रो आरे कारशेडच्या कामावरची स्थगिती गुरुवारी शिंदे सरकारने उठवल्याचा निर्णय घेतला आणि राज्यासह देशभरात पुन्हा एकदा आरे वाचवा मोहिमेला सुरुवात झाली. आरे मेट्रो कारशेडला विरोध करणारे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी पक्षाने देखील पुढाकार घेतला असून आरे वाचवण्यासाठी देशभर पर्यावरणवादी आंदोलनात उतरले आहेत.

दरम्यान एकीकडे पर्यावरणप्रेमी, प्राणीप्रेमी आणि त्यात राजकीय विरोधी पक्षसुद्धा आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केवळ मुंबईच नाही तर नागपूर, वाराणसी, हैदराबादसारख्या प्रमुख शहरांत पर्यावरणप्रेमींनी राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात एल्गार पुकारला आहे.

मुंबईत पर्यावरणप्रेमींचा विरोध आणि राजकीय कुरघोडीत अडकलेल्या आरे कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आरे कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. पर्यावरणाच्या कारणामुळे ठाकरे सरकारने आरे कारशेडचे काम थांबवले होते. त्यानंतर कांजूरमार्ग येथे कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मेट्रो कारशेडचा वाद न्यायालयात पोहोचला होता. पण महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार येताच आरेमध्ये पुन्हा कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता आरे कारशेडला घातलेली स्थगिती अधिकृतपणे उठवल्याने तांत्रिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे आरेमध्ये कारशेडचे बांधकाम पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेनेचा सुरुवातीपासून विरोध
आरेतील वृक्षतोड आणि मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. सत्तेत आल्यावर आरेला जंगल घोषित करणारच, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी तत्कालीन भाजप सरकारला इशारा दिला होता. आरे मेट्रो कारशेडप्रकरणी हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवत कारशेडसाठीच्या वृक्षतोडीला विरोध करणा-या सर्व याचिका फेटाळून लावल्याचा आदेश येताच रात्रीत आरे कॉलनीमध्ये वृक्षतोड करण्यात आली होती. वृक्षतोडीला सुरुवात होताच पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध करण्यात आला होता.

आरेमधील मेट्रो कारशेडचा वाद
मुंबई महापालिका जी गेली ३० वर्षे शिवसेनेच्याच ताब्यात आहे, त्याच महापालिकेतल्या वृक्ष प्राधिकरणाने आरे येथील झाडे तोडण्यास परवानगी दिली. इतकेच नव्हे तर याबाबत परवानगीचे पत्रही महापालिकेने मेट्रो प्राधिकरणाला दिले. वृक्ष प्राधिकरण समितीत ही मंजुरी दिली जात असताना बराच गोंधळ झाला, या गोंधळातच ही मंजुरी दिली गेली. त्यानंतर एका रात्रीत ‘आरे’मध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी २७०० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करण्यास रात्रीच्या काळोखाचा आधार घेण्यात आला होता. सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच त्यांनी ‘आरे’कडे धाव घेतली आणि मोठे जनआंदोलन सुरू झाले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या