24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी द्या

राज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी द्या

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि २२(प्रतिनिधी) राज्यपालांच्या पत्राला प्रत्त्युत्तर देऊन आपण राज्यातील अत्याचारपीडित महिलांच्या वेदनेची थट्टा उडवली आहे. केंद्र सरकारकडे बोटे दाखवून अशा घटनांची जबाबदारी आपणास टाळता येणार नाही. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपण ठोस कृती करून महिलांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी भाजपच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यातील महिलांच्या सन्मानाबद्दल आपण नेहमी छत्रपती शिवरायांच्या नीतीचा आदर्श ठेवत असतो. महाराष्ट्राच्या स्त्रीसन्मानाचा इतिहास आज खुंटीवर ठेवल्याच्या भावनेने आम्ही व्यथित आहोत. अन्य राज्यांतील गुन्हेगारीशी तुलना करून महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि महिलांवरील पाशवी अत्याचारांचे समर्थन होऊ शकणार नाही. या गुन्हेगारीस कठोर पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारनेच पावले उचलावयास हवीत, अशी अपेक्षाही महिला आमदारांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळून लावताना राज्यपालांना लिहिलेल्या खरमरीत पत्रात अन्य राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची जंत्री दिली होती. या पार्श्वभूमीवर भाजप महिला आमदारांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल महोदयांना उत्तर देऊन आपण राज्यातील अत्याचारपीडित महिलांच्या वेदनेची थट्टा उडविल्याची आमची भावना आहे. केंद्र सरकारकडे बोटे दाखवून अशा घटनांची जबाबदारी आपणास टाळता येणार नाही, असा इशारा आम्ही महाराष्ट्रातील भयग्रस्त महिलावर्गाच्या वतीने आम्ही देत आहोत. आपण योग्य ती दखल घ्याल आणि राज्यातील अनागोंदीचे लंगडे समर्थन तरी थांबवाल, असे पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत असल्याची कबुली आपण राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातून दिली असली तरी साकीनाक्यातील त्या दुर्दैवी पाशवी अत्याचारानंतरही मुंबईपलीकडेदेखील असलेल्या महाराष्ट्रात त्यानंतर घडलेल्या काही घटना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या नसाव्यात असे दिसते. आपण म्हणता त्याप्रमाणे अशी गुन्हेगारी काही एकट्या महाराष्ट्रात नाही. अन्य राज्यांतही ती आहे. पण आपण त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे याचा अभिमान बाळगावा अशी ही स्थिती खचितच नाही. नापासांच्या स्पर्धेत सर्वाधिक गुण संपादन करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा पळपुटेपणा पुन्हा अशा प्रकरणांतही दाखवावा ही आम्हा शिवरायांच्या महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींसाठी लाजीरवाणी बाब आहे. देशाच्या अन्य राज्यांतही गुन्हेगारी आहे हे आपले कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसे नाही, असे पत्रात म्हटले आहे.

आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक समस्येवर केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे कर्तृत्व दाखविले आहे. आता राज्यातील महिला भयंकर असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असताना आणि दिवसागणिक महिलांची अब्रू लुटली जात असतानादेखील आपण संसदेच्या अधिवेशनाची मागणी करून राज्याची अब्रू थेट दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात, अशी टीका पत्रातून केली आहे. या पत्रावर माधुरी मिसाळ, विद्या ठाकूर देवयानी फरांदे, मनीषा चौधरी, सीमा हिरे, श्वेता महाले- पाटील, मेघना साकोरे- बोर्डीकर, डॉ.नमिता मुंदडा, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर मोनिका राजाळे, मुक्ता टिळक यांच्या सह्या आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या