मुंबई : प्रतिनिधी
टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात उपचार घेणा-या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठी बातमी आहे. कॅन्सर रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी म्हाडाचे परळ भागात सर्व सुविधायुक्त १०० फ्लॅटस राहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. म्हाडाकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या या फ्लॅट्सचे उद्घाटन टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकाचे हाल व्हायचे थांबणार असून रुग्णांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे सांगण्यात आले.
डिसेंबर २०२१ मध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये राज्याच्या गृहनिर्माण विभागाने तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाने भोईवाडा परळ भागामध्ये १०० फ्लॅट्स देण्याचा निर्णय घेतला होता. मधल्या काळात म्हाडाकडून हे १०० फ्लॅटस टाटा रुग्णालयाला हस्तांतरित करण्यात आले. फ्लॅट्स हस्तांतरित झाल्यानंतर रुग्णांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवल्या जाव्यात, शिवाय या फ्लॅटमध्ये स्वच्छता राखली जावी, रुग्णांसाठी चांगले वातावरण निर्माण केले जावे त्या दृष्टिकोनातून तयारी केली गेली गेली. यासाठी टाटा रुग्णालयाने रोटरी क्लबच्या सहाय्याने या सर्व सोयीसुविधा पुरवल्या आहेत. रोटरी क्लबने रुग्णांना आवश्यक सर्व गोष्टी या फ्लॅटमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामध्ये बेड्स, सोफा, टीव्ही, फ्रिज आणि इतर सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. परळ भागामध्ये रुग्णांना हे फ्लॅट्स उपलब्ध करून दिल्याने रुग्णालयाच्या जवळ राहून कॅन्सरग्रस्त रुग्ण आपली ट्रीटमेंट पूर्ण करू शकतील.