24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रहसीना पारकरचा बॉडीगार्ड राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

हसीना पारकरचा बॉडीगार्ड राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

एकमत ऑनलाईन

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आहेत. गोवावाला कम्पाऊंड खरेदी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. कुर्ला येथील गोवावाला कम्पाऊंडची जागा बळकविण्यासाठी डी गँग सदस्यांसोबत आर्थिक गैरव्यवहार व गुन्हेगारी कट रचण्यात मंत्री नवाब मलिक यांचा थेट व जाणूनबुजून सहभाग होता, हे दर्शविणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे ईडीने मलिक यांच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रांची दखल घेताना विशेष पीएमएलए न्यायालयाने सांगितले.

गेल्या महिन्यात ईडीने मलिक यांच्यावर पाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले. त्याचे वाचन केल्यावर विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांनी म्हटले की, तक्रारीमध्ये आरोपीवर करण्यात आलेले आरोप आणि रेकॉर्डवर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता या प्रकरणावर पुढील कार्यवाही करण्यास पुरेशी कारणे आहेत.

तसेच ईडीच्या चौकशीदरम्यान खळबळजनक माहिती नवाब मलिक यांनी दिलेल्या जबाबातून उघड झाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असा जबाब मलिक यांनी ईडीला दिल्याची माहिती समोर आली आहे. २००२ सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता, असे नवाब मलिक यांनी ईडीला दिलेल्या जबाबात नमूद असल्याची माहिती दिली आहे.

फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नवनवीन आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दाऊद आपला भाऊ इक्बाल कासकरसह त्याच्या भावंडांना आणि नातेवाईकांना दर महिन्याला १० लाख रुपये पाठवत असल्याची माहिती ईडीला समजली आहे.

इक्बाल कासकरलाही ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. इक्बाल कासकरच्या बालपणीच्या मित्राचा धाकटा भाऊ खालिद उस्मान शेख याने ही माहिती दिली आहे. ईडीला दिलेल्या जबाबात खालिद उस्मान म्हणाला की, माझा भाऊ अब्दुल समद आणि इक्बाल कासकर हे बालपणीचे मित्र होते आणि त्यांनी बराच काळ एकत्र घालवला आहे. अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम टोळी यांच्यात झालेल्या टोळीयुद्धात ७ डिसेंबर १९९० रोजी माझा भाऊ मारला गेला, असे खालिद म्हणाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या