23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रबहुमताची परीक्षाही पास, एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार

बहुमताची परीक्षाही पास, एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज बहुमताची कसोटीही पार केली. सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४, तर विरोधात फक्त ९९ मते पडली.

आमदारांच्या अनुपस्थितीमुळे आघाडीला शंभरीही गाठता आली नाही, तर ३ आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. विधानसभा अधिवेशनाच्या दुस-या दिवशी आज एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे, असा ठराव मांडला.

या ठरावाला शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावावर राहुल नार्वेकर यांनी मतदान घेतले. प्रत्यक्ष मतदानापूर्वी ५ मिनिटांसाठी घंटा वाजविण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून शिरगणती सुरु झाली. शिंदे गट आणि भाजपसह बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेकाप, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती तसेच बहुतांश अपक्ष आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंंग्रेस आणि शिवसेनेच्या १५ आमदारांसह माकप, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयार आणि अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. समाजवादी पक्षाच्या दोन आणि एमआयएमच्या एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली. शेवटी १६४ विरुद्ध ९९ अशा फरकाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला.

सेनेचे आणखी एक आमदार शिंदे गटात
बहुमताच्या चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात दाखल झाले. शिंदे गटासोबत बसमधून ते विधानभवनात दाखल झाले. संतोष बांगर यांच्या येण्यामुळे शिंदे गटाकडील शिवसेना आमदारांची संख्या ४० वर गेली. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ १५ आमदार उरले आहेत. विशेष म्हणजे संतोष बांगर यांनी कालच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मविआ उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते. आज अचानक त्यांनी आपली बाजू बदलली.

विरोधी पक्षाचे अनेक नेते मतदानाला मुकले
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप सभागृहात दाखल होऊ शकले नाहीत. तसचे, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, जीशांत सिद्दिकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबरडे, शिरीष चौधरीदेखील आज सभागृहात नव्हते. त्यामुळे हे सर्व नेते मतदानाला मुकले. सभागृहात आधी चर्चा होऊन मग मतदान होते. मात्र, यावेळी आधी मतदान झाले. आम्ही येईपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद झाले होते, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या