मुंबई : सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकीसाठी विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजप, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीसह देशातील अनेक पक्ष या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावर सदाभाउंनी टोला हाणला आहे. राऊतांची भाषा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची टीकाही खोत यांनी केली.
सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि संजय राऊतांवर निशाणा साधला. भाजपाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यावा या संजय राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सदाभाऊ म्हणाले की, राऊतांचे मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करावे अशी कोणती कल्पना अद्याप तरी दिलेली नाही.
शरद पवारांनी मी उमेदवार नसल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे ‘ज्याचं त्याला कळंना अन् शेजा-याला रात्री झोप येईना’, अशी परिस्थिती खासदार राऊत यांची झाली आहे. त्यामुळे राऊतांना रात्रभर जागण्याची गरज नाही, ज्याला जे हवं ते वेळ आली की त्यांचे काम करतील, राऊतांची ही भाषा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.
सध्या राष्ट्रपती निवडणुकीवरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. असे असताना आता सदाभाऊंनी या वादात उडी घेतल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.