नागपूर : आज (शनिवारी) सायंकाळपर्यंत नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदियासह विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी विदर्भातील बहुतेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. नागपूर शहरातही काही ठिकाणी सरी बरसल्या. शुक्रवारीही दिवसभर आकाशात ढग दाटले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली.
जून महिन्यात सरासरी १६८.८ मि.मी. पाऊस होतो, पण यावर्षी १७ जूनपर्यंत फक्त ६.५ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. हवामान विभागाने विदर्भात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा केली आहे. मात्र अकोल्यात झालेला ९५.३ मि.मी. पाऊस वगळता इतर ठिकाणी ढग शांत आहेत.
गोंदिया ४.२ मि.मी., ब्रह्मपुरी १.४ मि.मी., वर्धा १ मि.मी.सह किरकोळ पावसाची नोंद झाली. नागपुरात शुक्रवारी सकाळपर्यंत ०.८ अंश पाऊस नोंदविला गेला. पण दिवसभर शुकशुकाट राहिला. मागील वर्षी ९ जूनला पावसाचे आगमन झाले होते. पण यावर्षी ७ दिवस उशिरा पाऊस पोहोचला. नव्या मानकानुसार पावसाळा वेळेवर पोहोचल्याचे मानले जात आहे.