मुंबई : मागील काही वर्षांपासून आरे येथील मेट्रो कारशेडबाबत वाद सुरू आहे, फडणवीस सरकराच्या काळात झालेल्या या निर्णयाला सर्व स्तरातून जोरदार विरोध करण्यात आला होता, शिवसेनेने विरोध केला आणि मविआ सरकारच्या काळात हे काम थांबवण्यात आले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि नव्या सरकारकडून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आधीच्या सरकारचा आरे मेट्रो कारशेडचा निर्णय बदलण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरेतच होणार असे संकेत दिले. दरम्यान या आरे कारशेडच्या बाबतीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधु तसेच मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे एकमत झाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आरे जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याला सुरुवातीपासून पर्यावरणवादी गटाची बाजू घेत, आरे येथील कारशेडचा निर्णयाविरोधातील भूमिकेला पाठिंबा दिला होता. आता या लढाईत अमित ठाकरे देखील उतरले आहेत, त्यांनी नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडबाबत पुनर्विचार करावा असे आवाहन करत सोशल मिडीयावर पोस्ट लिहिली आहे.