पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाविरोधात भूमिका घेतली, आणि त्या भोंग्याच्या आवाजाच्या दुपटीने हनुमान चालीसा लावावी असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी विरोधी भूमिका घेतली. ‘माझ्या प्रभागात मी अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचे भोंगे लावणार नाही.’ अशी थेट भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वसंत मोरे यांनी आपल्या प्रभागात ३ हजार ८०० मतदार मुस्लिम असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून आपली अडचण होत असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर वसंत मोरेंच्या याच विधानाचा धागा पकडत आज पुण्यातील कात्रज तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदू महासंघाने वसंत मोरे यांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे. ‘हे’५६ हजार लोक काम पाहून मतदान करतात. ‘ते’ ४ हजार मात्र धर्म पाहून आणि एवढ्या मोठ्या स्टेटमेंटनंतर सुद्धा सर्वच राजकीय पक्ष आमंत्रण देतात. आत्ताच जागे झालो नाही तर सर्वच लोकप्रतिनिधी असेच वागतील. ५६ हजार गृहीत धरले जातील. त्यामुळे कात्रज तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदू महासंघाने वसंत मोरे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले आहे.
हिंदू महासंघाचे आंदोलन
माझ्या प्रभागातील ४ हजार लोकांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून मी माझ्या प्रभागातील ५६ हजार लोकांच्या भावनेचा विचार करणार नाही अशी मानसिकता सध्या पुण्यात दिसत आहे. या महाराष्ट्रातील प्रत्येक जण जर प्रभागातील ४ हजार लोकांचा विचार करत असेल तर मग ५६ हजार लोकांचा विचार कोणी करायचा? त्या ५६ हजार लोकांना जागृत करण्याचे काम आम्ही करत आहोत, असे यावेळी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी म्हटले आहे.