कोल्हापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना व्यक्तिगतरीत्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असून छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला असून कुणीही अवमान केलेला नाही. दरम्यान, आपण अजूनही शिवसेनेत असल्याचे सूचक वक्तव्यही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती त्यांनी आज केले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी अनौपचारिक संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारी महिन्यापासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करायला अवधी होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना कदाचित तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या, असा सल्ला मिळाला असेल. पण त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहिती नाही. फडणवीस यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेणे अपेक्षित होते. पण त्यांनी तसे केले नाही.
२००९ नंतर त्यांनी जे काही समाजकारण, राजकारण केले त्यासंबंधी माझ्याशी कुठलाही विचारविनिमय केला नाही. त्यांचे निर्णय हे व्यक्तिगत होते. या प्रक्रियेतही नेमके असेच घडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. त्या दोघांमध्ये जी काही चर्चा झाली त्याचा कच्चा मसुदा तयार झाल्याचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र हा कच्चा मसुदा अंतिम नव्हता. त्या दरम्यान वाटाघाटी फिसकटल्या. शिवसेनेकडून कोल्हापुरातील संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली.
या निर्णयाकडे आपण कसे पाहता, असे विचारले असता शाहू महाराज म्हणाले, ‘हा निर्णय अतिशय चांगला असून गेली अनेक वर्षे पवार हे शिवसेनेत सक्रिय आहेत. या निर्णयानंतर मी स्वत: त्यांचे अभिनंदन केले आहे. खासदारकी हवी असेल तर त्या पक्षाचे नियमही सोबत येतातच. शिवसेनेत जायचे असेल तर शिवबंधन बांधावेच लागेल, हा त्या पक्षाचा निर्णय असतो त्यामुळे तो पाळावाच लागेल’ असा टोला त्यांनी लगावला.