Saturday, September 23, 2023

कॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा

पुणे : दुचाकीला कारने जोरात धडक देत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले कॉसमॉस बँकेचे मानद अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना न्यायालयाने सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी हा निकाल दिला.

भांडारकर रोडवर जुलै २०१६ मध्ये झालेल्या या अपघातात अरुंधती हसबनीस (वय २९) यांचा मृत्यू झाला होता. विक्रम सुशील धूत (३५, रा. इंद्रजित अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांनी याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अरुंधती या पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी करत होत्या. घटनेच्या दिवशी दुपारी अरुंधती दुचाकीवरून भांडारकर रोडवरून मैत्रिणीकडे निघाल्या होत्या.

लॉ कॉलेज रस्त्याकडून गुडलक हॉटेलच्या दिशेने जात असताना अभ्यंकर यांच्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अभ्यंकर घटनास्थळावरून पळून जात होते. नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले होते.

या खटल्यामध्ये एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील गिरीश बारगजे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. सरकारी वकिलांना फिर्यादीतर्फे ॲड. सूर्यकुमार निरगुडकर, ॲड. ऋग्वेद निरगुडकर आणि ॲड. शशांक वकील यांनी मदत केली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या