24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्राइमबायकोला साडी नेसता येत नाही म्हणून पतीची आत्महत्या

बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून पतीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : बायकोशी पटत नसल्यामुळे, वैचारिक मतभेदामुळे अनेकवेळा पतीने घटस्फोट घेतला किंवा आत्महत्या केल्याच्या घटना आजपर्यंत आपण ऐकल्या आहेत. पण औरंगाबादमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे.
बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
औरंगाबादमधील नवविवाहित तरुणाने मनासारखी बायको मिळाली नाही, त्यात तिच्या अनेक सवयी पटत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने व्हॉट्सअ‍ॅपवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे समोर आली आहे. अजय समाधान साबळे असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. बायकोला साडी नेसता येत नसल्याचा उल्लेख सुध्दा अजयने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजनगर भागात आई-वडिलांसोबत राहणारा अजय प्लंबरचे काम करून घर चालवत होता. दरम्यान पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या मोबाईलवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस ठेवले. त्यामुळे हे स्टेटस पाहून त्याचा एक मित्र त्याला घरी भेटायला आला. तो त्याच्या खोलीत गेला असता अजयने गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी अजयला रुग्णालयात हलवले, पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयच्या खोलीत एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. यात त्याने लिहिले आहे की, मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवायला नेले तर तिथेही ती जेवणानंतर स्वत:च्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते,असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. मात्र या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का, हे तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या