मुंबई : ‘ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली याचा मला आनंद झाला आहे. मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल,’ असा शब्द ओबीसी समाजातील नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना दिला. मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष वाढू नये यासाठी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.
ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी भूमिका घेतली त्याचा मला आनंद
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतले. शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले. माझी पहिल्या दिवशी पासून हीच भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आज ओबीसी समाजाचे नेते माझ्याकडे भेटायला आले होते. त्यांनी मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचा शब्द दिला. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी भूमिका घेतली त्याचा मला आनंद आहे,’ असे संभाजीराजे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांना भेटणार आहे
‘ओबीसी आणि मराठा समाजातील लोकांनी एकत्र येत यावर मार्ग कसा काढता येईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावा. तसेच सकल मराठा समाजाच्या लोकांसोबत मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांना भेटणार आहे. त्यावेळी ओबीसी समाजातील लोकांना सोबत घेऊन मार्ग काढण्याबाबत मार्ग सुचवणार आहे,’ असेही संभाजीराजेंनी सांगितले.
मराठा समाजात दुफळी निर्माण होत आहे हे मान्य केले पाहिजे
”ठोकून काढा’ या वक्तव्यातून मला सगळ्यांना एकसंघ राहा असं सांगायचे होते. कोण इकडे जातयं, कोण तिकडं जातयं, मराठा समाजात फूट पाडू नका हे सांगायचे होते. मराठा समाजात दुफळी निर्माण होत आहे हे मान्य केले पाहिजे. आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही हे आधी स्पष्ट झाले होते, त्यामुळे त्या मार्गावर का जायचं?’ असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थितीत केला आहे.
जमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला