मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. बुधवारी भाजपच्या वतीने मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत असताना जीभ घसरली. त्यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे’ असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांची पाठराखण केली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केला असल्याचे सदानंद सुळे म्हणाले.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
‘मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी ओबीसी आरक्षणासाठी संपर्क केला पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितले नाही’, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. ‘तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा अन्यथा मसणात जा. पण आरक्षण द्या. तुम्ही खासदार असून तुम्हाला एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची हे कळत नाही?’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती.
सदानंद सुळेंचे प्रत्युत्तर
‘महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे सुप्रियांबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होते की हे स्त्रीद्वेषी आहेत. जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. आई आहे… आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातल्या इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे… चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे.’ असे ट्विट करत सदानंद सुळेंनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत चोख प्रत्युत्तर दिले आहे.