मुंबई (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने संवैधानिक शिस्त कायम ठेवत निर्णय दिला आहे. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अध्यक्षांवर जी जबाबदारी आहे ती पार पाडत असताना मी उशीर लावणार नाही, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. त्याच वेळी मी कोणत्याही दबावाखाली येऊन काम केलेले नाही वा करणारही नाही त्यामुळे अध्यक्षांना धमक्या देऊन आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेऊ असे कोणाला वाटते तर त्यांचा तो गैरसमज आहे.
खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याला मी काडीचीही किंमत देत नाही, असेही त्यांनी ठणकावले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या भवितव्याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. आमदार अपात्रतेच्या महत्त्वाच्या प्रकरणावर ते काय व केव्हा निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेकडून, विशेषत: खा. संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्याबद्दल काही वक्तव्ये करीत न्याय होणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना नार्वेकर यांनी, अपत्रतेच्या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेऊ; पण कोणतीही घाई मी करणार नसल्याचे सांगितले. २०२२ जून-जुलैमध्ये राजकीय पक्ष कोणता होता, कोणत्या गटाचा होता, याचा निर्णय घेण्यास सांगितले आहे. राजकीय पक्ष कोणाचा होता हे निश्चित केल्यानंतर प्रतोद कोणी व्हावे, गटनेता कोणी व्हावे, याला मंजुरी देऊ नंतर प्रत्येक याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल. ५ याचिकांत ५४ आमदारांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकांवर सुनावणी घेत असताना नैसर्गिक न्यायाचा अवलंब करावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निर्णय दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रिझनेबल टाईम हा प्रत्येक केसनुसार असतो. राजकीय पक्ष कोण ठरविण्यासाठी आयोगाला ६ महिने लागले. न्यायालयालाही काही अवधी लागला. तसा आपल्याकडील प्रक्रियेलाही काही कालावधी लागेल. माझा निर्णय पूर्णपणे नि:पक्षपाती असेल. मूळ मुद्दा राजकीय पक्ष कोणाचा, हा आहे. राजकीय पक्षाची इच्छा काय होती, कोणी व्हीप बनावे, २०२२ मध्ये कोणता गट राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत होता, इथपासून निर्णय घ्यायचा आहे. केवळ संसदीय पक्षाची इच्छा नव्हे तर राजकीय पक्षाचे मत काय होते, हे लक्षात घेऊनच निर्णय करावा लागेल. तसे न्यायालयाने सांगितले आहे. जुलैमध्ये काय परिस्थिती होती याचे आकलन व निर्णय अध्यक्षांनी घ्यायचे आहे, असे न्यायालयाने सांगितले आहे, असेही नार्वेकर म्हणाले. मी कोणत्याही दबावाखाली येऊन काम केलेले नाही वा करणारही नाही. अध्यक्षांना धमक्या देऊन आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेऊ असे कोणाला वाटते तर त्यांचा तो गैरसमज असेल, असेही त्यांनी बजावले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्याबद्दल काही वक्तव्ये केली आहेत त्याबद्दल विचारले असता, विधानसभेच्या बाहेर कोणाच्या नियमबा वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही. त्याला काडीमात्र किंमतही देत नाही. संसद सदस्याकडून संवैधानिकरित्या भाष्य करणे अपेक्षित असते; पण काही लोकांकडून अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे, असेही नार्वेकर म्हणाले.