मुंबई : गेले काही दिवस सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या आगामी कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे.आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ‘बस बाई बस’ मध्ये सहभागी होणार आहेत. याचा एक भन्नाट प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये अमृता फडवणीस यांना थेट ‘मामी’ या विशेषणावरून प्रश्न विचारण्यात आला आहे तेव्हा त्या ‘मला तर फार मजा येते’ असे भन्नाट उत्तर देत रसिकांची मने जिंकली आहेत. हा व्हीडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे
झी मराठी वाहिनीवर येणा-या ‘बस बाई बस’ या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणा-या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमात याआधी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती.
यावेळी अमृता फडणवीस यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. अमृता फडणवीस देखील त्यांच्या विधानांमुळे ब-याचदा चर्चेत असतात. त्यांना खूप ट्रोलही केले जाते. याच ट्रॉलर्सनी अमृता यांना ‘मामी’ असे विशेषण दिले आहे. त्याच संदर्भात एका महिलेने प्रश्न विचारला आहे. ‘देवेंद्र यांना ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणजे ‘मामु’ असे म्हटले जाते तर तुम्हाला ‘मामी’ म्हणतात तर तुम्हाला कसे वाटते’ असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, ‘मला तर फार मजा येते,’ त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वच जण चकित होतात.
तर पुढे त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवून संवाद साधायला सांगितले जाते. त्यावेळी त्या म्हणतात, ‘अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे? आसामला नेताय का?’ असे त्या म्हणतात. यावेळी सर्वजण हसू लागतात. कारण देवेंद्रजी, आसाम आणि शिवसेनेशी झालेलं बंड यांचा मोठा संबंध आहे. त्यामुळे अमृता यांची ही मुलाखत भलतीच विशेष असणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अमृता फडणवीस गाणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.