23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रमी फक्त जनतेशी बांधील; संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

मी फक्त जनतेशी बांधील; संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचं आहे. मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर दावा सांगितला होता. या जागेवरून संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली होती. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने निवडणुकीत आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती.

मात्र, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्यापुढे पक्षप्रवेशाची अट ठेवली होती. मात्र, संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढण्यावर ठाम होते. त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार हे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. संभाजीराजे राज्यातील मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर संभाजीराजे पुढील भूमिका स्पष्ट करतील. संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवल्यास चुरस निर्माण होऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या