पंढरपूर : अतिशय प्राचीन काळापासून विठुरायाच्या या नगरीत शिल्पकला जोपासली जात आहे. म्हणूनच वर्षभर इथे बनवलेल्या शेकडो आकर्षक दगडी मूर्ती देशभर आणि अगदी सातासमुद्रापार जात असतात. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे कोणतीच यात्रा होऊ न शकल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता.
मात्र यंदा दोन वर्षांनंतर होत असलेल्या आषाढी महासोहळ्यासाठी मागणीनुसार दगडी मूर्ती बनवण्यासाठी कारागीर सध्या रात्रंदिवस झटत आहेत. यात्रा काळात या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने यंदा आषाढीसाठी मोठ्या प्रमाणात या मूर्ती बनवून ठेवण्यात आल्या आहेत. विठुराया आणि विविध संतांच्या मूर्ती हे पंढरपूरचे खास वैशिष्ट्य असते.
तुळशीमाळेचे मार्केट सज्ज
विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारक-याच्या गळ्यात तुळशीमाळ. देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते आहे. गळ्यात तुळशीची माळ हीच वारक-यांची ओळख असते. विठुरायाला प्रिय असणा-या तुळशीच्या लाकडापासून ही १०८ मण्यांची तुळशीमाळ बनते. देवाला तुळशी प्रिय म्हणूनच त्याच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारक-यांचे दैवत असते.
पंढरपूरमध्ये ही माळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो म्हणून या माळेला इथे विशेष महत्त्व असते. तुळशीची माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात अशी भागवत धर्मात धारणा आहे. वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही संबोधले जाते. या संप्रदायामध्ये तुळशीच्या १०८ मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणालाही वारकरी होता येत नाही. तुळशीची माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते.