27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादचे नामांतर झाल्यास १००० कोटींचा बोजा पडणार!

औरंगाबादचे नामांतर झाल्यास १००० कोटींचा बोजा पडणार!

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. या नामांतरावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील हा निर्णय मविआच्या किमान समान कार्यक्रमात नव्हता त्यामुळे अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. पवारांचे हे विधान म्हणजे हास्यास्पद असून औरंगाबादचे नाव बदलले तर सरकारी तिजोरीवर १००० कोटींचा बोजा पडेल असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

जलील म्हणाले, औरंगाबादवर नामांतराचा मुद्दा लादला जातोय. दोन-तीन टक्के असे लोक आहेत जे याकडे जाती-धर्माच्या बाजूने पाहतात. तर अनेक असेही लोक आहेत जे याला हिंदू-मुसलमानांचा मुद्दा बनवत आहेत. खरे तर हा असा मुद्दा होता कामा नये. एका शहराशी त्याची ओळख म्हणजेच इतिहास जोडलेला असतो.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच अगोदर औरंगाबादचा विकास करणार, या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणार त्यानंतरच संभाजीनगर असे नामांतर करण्याचा विचार करू, असे म्हटले होते. मात्र खुर्ची सोडण्याची वेळ आली तेव्हा लगोलग नामांतराचा निर्णय घेऊन टाकला.

औरंगाबादचे नामांतर जरूर करा, पण त्या अगोदर या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवा. नागरिकांना प्यायला पाणी द्या, चांगले रस्ते, वीज, मुलभूत सुविधा द्या. मग आम्ही स्वत: औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करा या आशयाचा प्रस्ताव घेऊन येऊ. आम्ही स्वत: ही मागणी करू असे खा. इम्तियाज जलील म्हणाले.

जर तुम्ही शहराचे नाव बदलले तर त्यावर मोठ्या प्रमाणावर सरकारी पैसा खर्च होतो. जर छोटे शहर असेल तर त्यासाठी किमान ५०० कोटी रुपयांचा खर्च येतो. जर मध्यम स्वरुपाचे शहर असेल आणि त्यात जर औरंगाबाद शहर येत असेल तर तर १००० कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडतो, यापेक्षा जास्तही खर्च होऊ शकतो. केवळ सरकारी कागदपत्रांवरील नावे बदलण्यासाठी हा खर्च होतो. हा तुमचा आमचा पैसा आहे.

त्याचा बोजा नागरिकांवर पडतो उदा.आधार कार्डमध्ये बदल करुन घ्यावा लागतो. माझ्याकडे पासपोर्ट, ओळखपत्र असेल, दुकान असेल तर त्यावर नाव बदलावे लागेल. यासाठी लोकांना रांगेत उभे राहून काम करावे लागेल. शिक्षणाविषयीची कागदपत्रे असतील तर त्यामध्ये देखील बदल करावा लागेल. परदेशात शिक्षणासाठी जाताना तुमची शैक्षणिक कागदपत्रे जुळली नाहीत तर तुम्हाला तिथे प्रवेश मिळणार नाही. यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे रांगेत उभे राहणार नाहीत, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या