सांगली : रस्त्याच्या कामात जर गडबड कराल, तर थेट बुलडोजर घालू असा सज्जड दम केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला. सांगलीच्या अष्टा या ठिकाणी पेठ सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की या रस्त्यासाठी सुपीक जमीन संपादित करण्यात येणार होती. त्यामुळे काहीसा विलंब झाला. मात्र, आता रस्त्याचे काम सुरु होत आहे. या रस्त्यासाठी ८६० कोटींचा खर्च होणार आहे. कंत्राट मिळाले आहे, महिनाभरात सुरु होईल, पुढील २५ वर्षात एकही खड्डा पडणार नाही, असा रस्ता होईल. मी ठेकेदारांना नेहमीच सांगतो, मी तुमच्याकडून माल (टक्केवारी) खात नाही. देशात एक ठेकेदार नाही असा ज्याच्याकडून मी एक रुपया घेतला आहे.
त्यामुळे कामात गडबड केल्यास बुलडोझरखाली टाकेन. दरम्यान, सांगली शहराला पुणे बंगळूर महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. या रस्त्यावर असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेले अर्धवट काम यामुळे वाहनधारक तसेच नागरिकांमधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत होता. हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून हा रस्ता सांगली पेठ चौपदरीकरण रस्ता करण्यात येत आहे.
या रस्त्याचे या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. ते म्हणाले की, या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल त्यानंतर पुढील २५ वर्ष या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही, अशा पद्धतीचे काम केले जाईल. मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेत नाही, या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला.