23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमहाराष्ट्रपूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा सुरळीत करा, रस्ते दुरूस्तीची कामे तातडीने सुरू...

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा सुरळीत करा, रस्ते दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करा

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करणे आवश्यक असून यासाठी नुकसानभरपाई व मदतीचे प्रस्ताव तातडीने तयार करा. पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करा. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली स्थिती आणि नुकसानीचा आढावा घेतला. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह व सर्व विभागाचे सचिव उपस्थित होते. पूरग्रस्त भागातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, वीज पुरवठा याबाबत बैठकीत तपशीलवार आढावा घेण्यात आला.

नुकसान भरपाई, मदतीचे प्रस्ताव तयार करा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाची मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करण्याचे आदेश यावेळी दिले. आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचवणे आवश्यक आहे. पूराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायीकांची माहिती एकत्र करा, त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तत्काळ मदत देतानाच पुन्हा पुन्हा ही आपत्ती येऊ नये यासाठी पूरसंरक्षक भिंती, धोकादायक वस्त्यांयाबाबत कायमस्वरूपी उपाययोजनाचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच हे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पूराचा इशारा देणारी यंत्रणा बसवणार
कोकणात एकूण २६ नद्या असून, याठिकाणी पूराबाबत इशारा देणारी ‘आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

एसडीआरएफचे बळकटीकरण
एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचे केंद्र असावे. तसेच त्याठिकाणी जवांनांना मदत व बचावाचे प्रशिक्षण द्यावे यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले. महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगर उतारांवरील वाड्या आणि वस्त्यां ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशापद्धतीने पुनर्वसन करता येईल, यावर निश्चित असा आऱाखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी, महाबळेश्वर, पोलादपूर आणि पन्हाळा याठिकाणचे रस्ते अर्धे खचले आहेत. त्याठिकाणी पाईप्स टाकून एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एकूण २९० रस्ते दुरूस्त करण्याची गरज असून, ४६९ रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. ८०० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या असल्याची माहिती दिली. तर ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी, बारामती- सातारा आणि पेण अशा दोन उपकेंद्रांचे नुकसान झाले असून, १४ हजार ७३७ ट्रान्सफॉर्मर्स नादुरूस्त झाल्याची माहिती दिली. यापैकी ९ हजार ५०० ट्रान्सफॉर्मर्स दुरूस्त करण्यात आले असून, नादूरुस्त ६७ उपकेंद्रांपैकी ४४ परत सुरू करण्यात आले आहेत. एकंदर ९ लाख ५९ हजार बाधित ग्राहकांपैकी साडे सहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महाडमध्ये दोन मोठे वीज मनोरे तातडीने दुरूस्त करणे सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

पूरग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठा
पूरग्रस्त ७४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, पोलादपूर याठिकाणी पाणी पुरवठा योजनांचे पुरामूळे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत १७ गावांना तसेच सिंधुदुर्गात २० गावांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पुरामुळे साथ रोग पसरू नये ताची काळजी घेण्यात येत असून, ४९६ गावांमध्ये ४५९ वैद्यकीय पथके प्रत्यक्ष घरोघर भेटी देत आहेत. कोल्हापूर जिल्हयात २९३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६ मदत छावण्या उघडण्यात आल्याची माहिती आरोग्य सचिवांनी दिली.

देश प्रथम, नेहमीच प्रथम!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या