25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रपनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह ६५ जणांचा शिंदे गटात प्रवेश

पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह ६५ जणांचा शिंदे गटात प्रवेश

एकमत ऑनलाईन

पनवेल : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल झाले आहेत, तर आता मनसेचे नेतेसुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत. पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह ६५ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे. पण अजूनही शिंदे गटामध्ये शिवसेचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी प्रवेशाचा धडाका लावला आहे. पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अतुल भगत हे मागील ८ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर विराजमान होते. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतुल भगत यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह एकूण ६५ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मनसेमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे कारण देत अतुल भगत यांनी शिंदे गटात सामील होत असल्याचे सांगितले आहे.
उप तालुका अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अलीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईसह रायगडचा दौरा केला. अमित ठाकरे दौरा करून जात नाहीत, तोच पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. बहुमत चाचणीमध्ये मनसेने शिंदे-भाजप सरकारच्या बाजूने मतदान केले होते. मनसेने शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिल्यानंतरही पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. आता या प्रवेशावरून शिंदे गट आणि मनसेमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या