मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली रणनीती यशस्वी झाली. यावरून अपक्ष आमदार शरीराने महाविकास आघाडीसोबत असले तरी मनाने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असल्याचे दिसून येते, असे आमदार रवी राणा राज्यपालांची भेट घेतल्यानंतर म्हणाले.
निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची जादू पाहायला मिळाली. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अपक्षांची देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती असल्याचे या निकालावरून दिसून आले, आता विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही भाजपचा पाचवा उमेदवार विजयी होईल. विधान परिषदेच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा धक्का बसेल, मते फुटतील आणि धक्का बसेल, असे आमदार रवी राणा म्हणाले.
अडीच वर्षात अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री भेटले नाहीत. त्यांची समस्या ऐकली नाही. त्यामुळे त्यांनी कोणतीही योजना आखली तरी ती कामी येणार नाही. त्यांची मते फुटतील. अशी योजना आखली आहे. या योजनेला जुळून आम्ही काम करीत आहोत, असेही रवी राणा म्हणाले.